मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली असावी, असे सांगितले जात आहे.
सध्या शिंदे सरकारवर मंत्रिमंडळ विस्तारावरून टीकास्त्र सोडले जात आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार न्यायालयीन प्रकरणामुळे नव्हे, तर खाते वाटपावरून रखडले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला जावे लागले होते. मंत्रिमंडळासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्तगू झाल्याचे समजते. त्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. मात्र, आता सर्वांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे या दोन दिवसांत तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे नाहीत, असे सांगितले जात आहे.