गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
पणजी : शिंदे गटातील बंडखोर आमदार गुवाहाटीहून बुधवारी रात्री थेट गोव्यात पोहोचले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजीनाम्याची धावपळ सुरू असतानाच रात्री उशिरा हे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले. गोव्यातील ताज कन्व्हेंशन हॉटेलमध्ये ते मुक्कामी आहेत. हे आमदार गोव्यात पोहोचताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आमदारांसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी या आमदारांनी जल्लोष केला. गुरुवारी हे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.
दोनापॉल येथील ताज कन्व्हेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता हे आमदार पोचले. त्यांच्यासाठी ७१ खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून, उद्या गुरुवारी ते महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी निश्चित होती. त्यामुळे बंडखोर आमदार त्याच तयारीने गुवाहाटीतून निघून गोव्याला निघाले होते. मात्र, गोव्यात पोहोचण्याअगोदरच ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री उशिरा गोव्यात पोहोचले.
या हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच बंडखोर आमदार येथे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हॉटेलला अक्षरश: छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. तेथे कडेकोट बंदोबस्त असल्याने कोणालाही आतमध्ये सोडण्यात आले नाही. गोव्यात राजकीय उलथापालथी कमी नाहीत. त्यातच महाराष्ट्रातील बंडखोर आमदार पणजीत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणावरून याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरातील नजरा या राजकीय घडामोडींकडे लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्हाला राजीनाम्यामुळे दु:ख झाल्याची प्रतिक्रिया दिली. परंतु आम्ही अगोदरच कॉंग्रेस,राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्री ऐकले नाहीत, असे बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.