नागपूर/औरंगाबाद : शाळा बंद करण्याबाबत पालकांचा विरोध पाहून राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक परिस्थितीचा विचार करुन जिल्हाधिका-यांनी निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यानूसार राज्यातील महानगरांमधील शाळा अजून ५ दिवसतरी बंदच राहणार असून २६ जानेवारीनंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात अजून आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. पॉझिटिव्हटी रेटही २७ टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सर्वांनी एकमताने निर्णय घेतल्याची माहिती देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील आठ दिवसांनंतरच शाळा सुरु होतील, असे सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात शनिवारी (दि.२२) जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह महत्त्वाच्या अधिका-यांबरोबर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भुमिका जाहीर केली. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊनच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादमध्येही महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पहिली ते ९ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आठ दिवसांनी घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेता, या वर्गांच्या शाळा सोमवारपासून सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील शाळांबाबत जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या साप्ताहिक बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले.