25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रकायदेशीर लढाईसाठी दोन्ही गट सज्ज

कायदेशीर लढाईसाठी दोन्ही गट सज्ज

एकमत ऑनलाईन

शिंदे गटाची १३० वकिलांची फौज तयार, ठाकरेही सरसावले
मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावर निवडणूक आयोगात जेव्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा शिवसेना संघटनेत २ तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी त्यांनी १३० बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे.

१३० वकिलांच्या फौजेत मुकुल रोहतगी, नीरज कौल, अरविंद दातार, माजी महाधिवक्ता डायरस खंबाटा यांसारख्या ज्येष्ठ वरिष्ठ वकिलांसह सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र वकिल श्रीयांश लळित यांनाही ठेवण्यात आले आहे. शिंदे गटाच्या या पहिल्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांची बंडखोरी होऊनही शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट नाही. हे निवडणूक आयोगात सिद्ध करण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आमदार सचिन अहिर यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह देण्यास निवडणूक आयोग नकार देऊ शकतो. या आणीबाणीला तोंड देण्यासाठी शिंदे गटाने मित्रपक्ष भाजपच्या सहकार्याने रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे उत्तर देणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितले की, पक्षाच्या वतीने सोशल मीडिया हाताळणा-या तरुण शिवसैनिकांची टीम शिवसेना भवनात तैनात करण्यात आली आहे. गरज भासल्यास प्रोफेशनल लोकांचीही मदत घेतली जाणार आहे.

प्रतिज्ञापत्रे ठरणार महत्त्वाची
विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि तेथील पदाधिका-यांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे आयोगासमोर सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातूनही गटप्रमुखांपासून नेतेपदापर्यंतच्या पदाधिका-यांची प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे सादर केली जाणार आहेत. यावरून शिवसेना संघटनेतील दोन तृतीयांशहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सिद्ध होईल. या प्रकाराची माहिती शिवसेना भवनशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने दिली.

 

जिथे गाव, तेथे शाखेचा फायदा
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेची टीम अल्पावधीत पक्षाचे निवडणूक चिन्ह लोकांमध्ये लोकप्रिय करण्यात शंभर टक्के यशस्वी ठरेल. ग्रामीण भागात जिथे गाव,तेथे शाखा शिवसेनाप्रमुखांची ही खूप जुनी संकल्पना पक्षासाठी जीवदान देणारी ठरणार आहे.

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या