24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रख्राजगी कंपनीला हायकोर्टाचा दणका

ख्राजगी कंपनीला हायकोर्टाचा दणका

एकमत ऑनलाईन

न्यायालयाची दिशाभूल करून जमिनीचा हक्क मिळविला
मुंबई : मेट्रो-कारशेडच्या वादग्रस्त जागेसह परिसरातील ६,३७५ एकर जागेची मालकी खासगी कंपनीला देणारा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. न्यायालयाची दिशाभूल करुन खासगी कंपनीने जमिनीच्या मालकीचा हक्क मिळवल्याचे निरीक्षणही न्यायालयाने आदेश रद्द करताना नोंदवले. त्याचवेळी मेट्रो-३ कारशेडच्या वादग्रस्त जागेसह परिसरातील ६,३७५ एकर जागेच्या मालकीवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत आपण काहीच भाष्य करणार नसल्याचेही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने स्पष्ट केले. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारला दिलासा मिळूनही मेट्रो-३ कारशेडच्या वादग्रस्त जागेचा पेच कायमच राहणार आहे.

न्यायालयाची दिशाभूल करून आदर्श वॉटर पार्क्‍स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स या खासगी कंपनीने जमिनीची मालकी मिळवल्याचा आरोप करून राज्य सरकारने अ‍ॅड. हिमांशु टक्के यांच्यामार्फत त्याविरोधात याचिका केली होती. या याचिकेत कंपनीसह, केंद्र सरकार, पालिका आणि खासगी मालकी असलेल्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या एकलपीठासमोर दोन दिवस या प्रकरणी प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर राज्य सरकारच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षण, रेल्वे आणि मीठागर आयुक्तालय तसेच पालिकेतर्फे अनुक्रमे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह आणि अ‍ॅड्. बुरहान बुखारी यांनी कांजुर येथील जागेवर किंवा तिच्या काही भागावर आपला मालकी हक्क सांगितला. तसेच खासगी कंपनीने न्यायालयाची फसवणूक करून आदेश मिळवल्याचा दावा केला होता व खासगी कंपनीला जागेचा मालकीहक्क देण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती मेनन यांनी बुधवारी या प्रकरणी निर्णय देताना राज्य सरकार, केंद्र सरकार, पालिकेचा दावा मान्य केला. खासगी कंपनीने न्यायालयाची दिशाभूल केली. तसेच या जागेवर इतर दावेदारांचाही हक्क असल्याची वस्तुस्थिती लपवून संपूर्ण जागेवर मालकीहक्काचा आदेश मिळवला. वस्तुस्थिती दडवून कंपनीने आपल्या बाजूने आदेश देण्यास न्यायालयाला प्रवृत्त केले. निर्विवादपणे खासगी कंपनीने न्यायालयाची फसवणूक केली असल्याबाबत तसूभरही शंका नसल्याचे न्यायमूर्ती मेनन यांनी आदेशात प्रामुख्याने नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या