जळगाव : राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा, यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे, ते कुठे तरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, हे थांबले पाहिजे. यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडी सर्व पक्षांमध्ये मध्यस्थी करेन, मी सर्वांशी बोलायला तयार आहे, असेही त्या म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, असा आरोप होत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावरही अंडी फेकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. असे बोलणे अत्यंत वाईटच असल्याने यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी सर्वांनी निषेधाची भूमिका नोंदवली. याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी मी स्वत: पुढाकार घ्यायला तयार आहे. तसेच प्रत्येक पक्षातील नेत्यांशी बोलायला तयार आहे. मात्र, हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.