ठाणे : ठाण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अंबिकानगरमध्ये आगीची मोठी घटना समोर आली. ही आग शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर २९ मध्ये प्लॉट नंबर ए-२०२ मध्ये ही आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. ८ ते ९ सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु होते. आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण आग खूप मोठी असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कारण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळ परिसरातून तब्बल ७ ते ८ वेळा मोठ्या स्फोटाचा आवाज आला आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळेच ही आग वाढत असल्याची भीती स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.
घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी २- फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांकडून सदर आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.