मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयावर टीका करताना भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून टीका केली होती. याला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिलांची नावं आता चंपा आणि चिवा ठेवू, असे त्यांनी म्हटले आहे. महापौरांच्या या विधानामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत.
पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना महापौर किशोरी पेडणेकर या काहीशा संतापल्या आणि त्यांनी ते विधान केले. त्या म्हणाल्या, आम्ही वाघिणीच्या बछड्याचे नाव वीरा ठेवले आहे. तसेच., पेंग्विन हे मुलांसाठी वेगळे आकर्षण आहे. पण इतक्या खालच्या स्तरावर येऊन तुम्ही टीका करणार असाल तर पुढच्या वेळी आपण चिवा आणि चंपा अशी नावे ठेवू. तुम्हीच म्हटले आहे ना मराठी नावं ठेवा मग आता येणा-या हत्तीच्या बाळाचे नाव आम्ही चंपा ठेवू आणि माकडाचे बाळ आहे त्याचे नाव चिवा ठेवू, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.