29.2 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeमहाराष्ट्रतिन्ही पक्षांनी एकत्रच लढावे

तिन्ही पक्षांनी एकत्रच लढावे

एकमत ऑनलाईन

ठाणे : राजकीयदृष्ट्या विचार केला तर, कार्यकर्त्यांचे मनोमिलन आज केले नाही तर पुढील काळात ते अवघड जाईल. हा धोक्याचा इशारा सर्वांना आहे. महापालिका नजरेसमोर ठेवून पुढील १० वर्षांचे राजकारण केले जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवार, दि. २० जानेवारी रोजी येथे सांगितले.

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढल्यामुळे महाविकासआघाडीला काहीसा फटका बसला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहता महाविकासआघाडी झालीच पाहिजे, असे मी नेहमीच सांगत होतो. लोकांना जे वाटायचे असेल ते वाटू द्या. राजकीयदृष्ट्या विचार केला तर, कार्यकर्त्यांचे मनोमिलन आज केले नाही तर पुढील काळात ते अवघड जाईल. हा धोक्याचा इशारा सर्वांना आहे.

महापालिका नजरेसमोर ठेवून पुढील १० वर्षांचे राजकारण केले जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीतही नगरपंचायत निकालासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असला तरी महाविकासआघाडीचे एकत्र संख्याबळ जास्त आहे. त्यादृष्टीने भविष्यात कशाप्रकारे निवडणुका लढवायच्या याविषयीच्या रणनीतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोण कितव्या क्रमांकावर आहे, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. हे निकाल पक्षांच्या स्थानिक ताकदीनुसार लागले आहेत. परंतु, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जमते ही गोष्ट भाजपला पचत नाही. इतकी वर्षे सोबत असणा-या मित्रपक्षाचा केसाने कसा गळा कापायचा, ही गोष्ट आम्ही भाजपकडून शिकलेलो नाहीत. भाजपने राज्यात शिवसेनेचे कशाप्रकारे खच्चीकरण केले, हे सर्वांना माहिती आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

नगरपंचायत निवडणूक निकालावरून भाजपाला टोला
नगरपंचायत निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, भाजपा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचे स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढत राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे.

महाविकास आघाडी म्हणूनच निकालाचा स्वीकार
आम्ही महाविकास आघाडी म्हणून निकालाकडे पाहत आहोत. राज्यात एकत्र सरकार चालविताना एकमेकांचे बोट धरून चालत आहोत, त्यामुळे तसेच पाहावे लागेल. या निवडणुका खूपच तळागाळात होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे उद्या काय होईल या दृष्टीने पाहणे गरजेचे नाही. भाजपासोबत असतानाही असाच निकाल येत होता. पण विधानसभा, लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही यावर गांभीर्याने विचार करतो. स्थानिक निकालावर तेथील नेते बोलतील, असे संजय राऊत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या