26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रदारू दुकानांना दिलेली महापुरुष, देवता, गडकिल्ल्यांची नावे हटवा

दारू दुकानांना दिलेली महापुरुष, देवता, गडकिल्ल्यांची नावे हटवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारने दारूच्या दुकानांना देवी-देवता, महापुरुष आणि ऐतिहासिक किल्ल्याची नावे देण्यावर बंदी घातली आहे. देवी-देवतांची, महापुरुषांची किंवा ऐतिहासिक किल्ल्यांची नावे असलेल्या अशा दारूच्या दुकानांना नाव बदलण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दारू दुकाने, बार यांना देवता किंवा महापुरुषांचे नाव देण्याचा ट्रेंड आहेत. याविरोधात काही सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार आता राज्याच्या गृहविभागाने हा आदेश काढला आहे.

राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांबाबत तसेच महापुरुषांबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असते. अशा परिस्थितीत देवदेवता, महापुरुषांची, गडकिल्ल्यांची नावे वापरून दारूची दुकाने, बार सुरू करून या देवता, महापुरुष आणि ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिष्ठेला धक्का लावला जातो. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक भावनाही दुखावल्या जातात. त्यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते, असे गृहविभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

काय म्हटले आहे आदेशात?
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशात राज्यातील गड-किल्ले आणि महापुरुषांसह सर्वांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा राखणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात ज्याठिकाणी कोणत्याही प्रकारची दारू विकली जाते, अशा ठिकाणांना कोणत्याही देवी-देवता, महापुरुष, ऐतिहासिक, प्रतिष्ठित व्यक्तींचे नाव देण्यावर बंदी घालण्यात येत आहे. कोणत्याही दारूच्या दुकानाला देवदेवतांचे, महापुरुषांचे किंवा किल्ल्यांचे नाव दिलेले असेल तर त्यांनी ३० जूनपर्यंत दुकानाचे नाव बदलावे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

गृहविभागाकडून यादीही जाहीर
राज्यातील दारू दुकाने, बार यांना कोणत्या महापुरुषांची आणि गड-किल्ल्यांची नावे देऊ नयेत, याची यादीच गृहविभागाकडून जारी करण्यात आली आहे. या यादीत ५६ महापुरुष आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे आणि राज्यातील १०५ गड-किल्ल्यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या