सर्वच महापालिका अनुकरण करणार?
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने पाऊल टाकत तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड करण्यात आली.
तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे. शहरात पाच हजारांपेक्षा अधिक तृतीयपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथीयांकडे नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. दुसरीकडे त्यांना सन्माने जगता, वावरत यावे म्हणून महानगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीयपंथीयांनी देखील समाधान व्यक्त करत पालिकेचे आभार मानले.
हा प्रकल्प सामाजिक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त तसेच प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. बहुतेक लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यांचा असा विश्वास आहे की, आम्ही सेक्स वर्कर किंवा भिकारी आहोत. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रुजू झालेल्या निकीता, रूपाली यांनी दिली आहे.
देशात तृतीयपंथीयांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. वकील, डॉक्टर आणि सरपंच. नगरसेवक म्हणूनसुद्धा तृतीयपंथीयांना निवडून दिले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांना रुजू करुन घेत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.