पुणे : मौजमजेसाठी परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत तेजस गोंधळे (रा. तेजदीप निवास, गोंधळेनगर, हडपसर, पुणे), अजिंक्य मोडक (वय- ३४, रा. फुरसुंगी, पुणे), चेतन मोरे (वय -२४, रा. तुकाई दर्शन, पुणे) या आरोपींविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यावर पुन्हा घरी परतत असताना, तिघेजण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ काहीकाळ थांबले. त्याठिकाणी त्यांच्याकडून अचानक पिस्तुलातून हवेत गोळीबार करण्यात आला.
परिसरातील उपाहारगृहचालक आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित गोळीबाराचा आवाज ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपी गोंधळे, मोडक, मोरे मोटारीतून पसार झाले होते. परंतु परिसरातील नागरिकांनी वाहनांचा क्रमांक लिहून ठेवला होता.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने आरोपींचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.