23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रभाडोत्री सैन्य हा काय प्रकार? : मुख्यमंत्र्यांचा सवाल

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार? : मुख्यमंत्र्यांचा सवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे. भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? मग भाडोत्री राजकारण्यांसाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवरून हल्लाबोल केला. हाताला काम नसेल तर राम राम करण्यात अर्थ नाही, अशी वचनं द्यावीत जी पाळता येतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. देशातील तरुणांवर ही वेळ का आली? मत म्हणजे आयुष्य असतं, शिक्का नव्हे, अग्निपथ योजना मृगजळ असल्याचे ते म्हणाले. भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? मग भाडोत्री राजकारण्यांसाठीसुद्धा टेंडर काढा, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

शिवसेनेच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना संबोधित केले. शिवसेनेच्या जन्माचा इतिहास, बाळासाहेबांच्या कडू-गोड आठवणी, केंद्र सरकारची अग्निपथ योजना, राज्यसभा निवडणूक-विधान परिषद निवडणूक, अशा मुद्यांवर भाष्य करत पहिल्या फळीतील सेना नेत्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.

‘अग्निपथ’मुळे तरुण रस्त्यावर आले आहेत. या तरुणांची माथी कुणी भडकवली, हृदयात राम आणि हाताला काम हे आपले हिंदुत्व आहे. तेच चित्र आज देशात आहे. काम नसेल तर काहीही उपयोग नाही. ऐन उमेदीच्या वयात पोरांना मृगजळ दाखवणार, त्यानंतर पोरांच्या हाताला काय लागणार? तरुणांवर ही वेळ का आणि कुणामुळे आली? अचानक योजना आणायची, अग्निवीर नाव द्यायचं पण शिकवणार काय? चार वर्षांनी यांच्या नोकरीचा पत्ता नाही. शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात ते म्हणायचे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ १६व्या वर्षी घेतली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६व्या वर्षी लिहिली. पण आता उमेदीच्या वयात पोरांना काहीतरी मृगजळ दाखवणार आणि नंतर फक्त १० टक्के लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य आणायची कल्पना करताय तर मग काढा टेंडर. भाडोत्री राज्यकर्तेही आणू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

हीच लोकशाही
पुढे ते म्हणाले की, शिवसैनिकांच्या संघर्षामुळेच शिवसेना उभी झाली. ५६ वर्षे शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हीच आजची लोकशाही आहे. आज आपल्यासोबच ५६ आमदार आहेत. उद्याच्या विधान परिषद निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेचे राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटलेले नाही. एकदा मागे मतांमध्ये फाटाफूट झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की,‘मला आईचे दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको’ हे वाक्य खूप मोलाचे असून मला असा नराधम शिवसेनेत नको आहे.

दमडीचीही किंमत नाही
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे यांना दमडीची किंमत नाही मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यावर समोरचा माणूस आदराने पाहतो. मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय मला काहीच फरक पडत नाही, कारण माझे जे नाव आहे ते कुणीही काढू शकत नाही. ते कित्येक जन्माचे भाग्य आहे.

शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत : संजय राऊत
शिवसेनेचा ५६वा वर्धापनदिन आहे. अब तक ५६ और भी आगे जाएंगे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ५६ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी शिक्का मारण्यात आला. पण बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचे राजकारण उभे आहे. एक प्रादेशिक पक्ष काय करू शकतो हे शिवसेनेने दाखवून दिले. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे.

वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचा टीझर
शिवसेनेने टीझर प्रदर्शित केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील,‘भगवा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा,’ या वाक्याने टीझरची सुरुवात आहे. शिवसेनेचे हिंदुत्व साफ है, रघुकुल रीति सदा चली आयी, प्राण जाय पर वचन ना जाय. ‘हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व आहे,’ असेही या टीझरमध्ये म्हणण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या