डोंबिवली : राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाण्यामधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रीचेबल झाले आहेत. मात्र, त्यांनी ट्विट करून अंतिम निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असे म्हटले आहे. त्यामुळे मनसेचे मत नेमके कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप-मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता, तर दुसरीकडे ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचेसुद्धा संबंध चांगले आहेत. मात्र, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आमदार पाटील कोणाच्या गळाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.