फक्त ४२ हजार क्विंटल बियाणेच बाजारात
मुंबई : ऐन खरिपाच्या तोंडावर बाजारात महाबीज बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. शेतक-यांची महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी मोठी धावाधाव पाहायला मिळत आहे. महाबीजचे यावर्षी फक्त ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी राज्यभरात जवळपास १० लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्याची मागणी असते. मात्र, यंदा बाजारात केवळ ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आल्याने आधी सोयाबीनची भाववाढ आणि आता महाबीजचे महागलेले सोयाबीन बियाणेही बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सोयाबीन बियाण्यासाठी शेतक-यांची फरफट होत आहे. अकोल्याच्या बियाणे बाजारात वाशिम जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील आणि अकोल्यातील शेतक-यांचा महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी आटापीटा सुरू आहे. मात्र, शेतक-यांच्या पदरी निराशा येत आहे.
राज्यात यावर्षी जवळपास १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहे. यासाठी जवळपास ९ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता बाजारात आहे. दरवर्षी यातील निम्मा वाटा महाबीजचा असतो. दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात आणत असलेल्या महाबीजने यावर्षी फक्त ४२ हजार क्विंटल बियाणेच बाजारात आणले. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पाहायला मिळणार आहे. आधीच रासायनिक खतांची भरमसाट दरवाढ, डिझेल महागल्याने मशागतीचा खर्च वाढला. त्यातच शेतक-यांचे महामंडळ म्हटल्या जाणा-या ‘महाबीज’च्या बियाण्यांचे दरही गगनाला भिडले आणि कहर म्हणजे थेट बियाण्यांचाच तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.
गेल्या चार वर्षांतील बियाणे पुरवठा
वर्ष : बियाणे (क्विंटलमध्ये)
२०१९ : ५ लाख २५ हजार क्विंटल
२०२० : २ लाख ३५ हजार क्विंटल
२०२१ : १ लाख ५२ हजार क्विंटल
२०२२ : ४२ हजार क्विंटल
अतिवृष्टी, उन्हामुळे सीड प्लँट वाया
मागील वर्षी बियाणे भरण्याच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीड प्लॉट वाया गेले. त्यानंतर बरचसे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीत नापास झाले. यातून मार्ग काढण्यासाठी उन्हाळी सोयाबीनचा पर्याय महाबीजने निवडला. परंतु यंदा वाढलेल्या तापमानाचा फटका बियाण्याला बसला.
बच्चू कडूंचा गंभीर आरोप
राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावतीच्या चांदूर बाजार येथे गंभीर आरोप करीत गेल्या वर्षी बिजोत्पादन तयार केलेले बियाणे संपल्यानंतर महाबीजने बाजार समितीमधील बियाणे खरेदी केले आणि तेच बियाणे महाबीजच्या पॅकेटमध्ये टाकून विकले, असा आरोप केला. त्यामुळे शेतक-यांच्या मनात संशय निर्माण होत आहे. मात्र, महाबीज कंपनीने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
बियाण्यांचे दर गगनाला
एकीकडे महाबीज बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात अगोदरच महाबीजने बियाण्याचे दर वाढविले आहेत. महाबीजची सोयाबीनची ३० किलोची बॅग आता ३९०० रुपयांवर गेली आहे. २२०० रुपयांवरून बॅगची किंमत थेट ४ हजारांच्या जवळपास गेल्याने शेतक-यांचे कंबरडे मोडणार आहे. अगोदरच डिझेल दर वाढल्याने नांगरणी, पेरणी, मोगडणीचे दर वाढले आहेत. त्यात खत, बियाण्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.