मोहित कंबोज सोबत असल्याने चर्चेला उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अस्लम शेख आणि मोहित कंबोज या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते. अस्लम शेख यांनी मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी मोहित कंबोज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता थेट अस्लम शेख आणि मोहित कंबोज यांनी एकत्रित देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारण कुठल्या वळणावर जाणार, हे पाहावे लागणार आहे. सेनेतील आमदार फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये काय घडणार, असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होत आहे.
किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी ३०० कोटी प्रकरणी कागदपत्र संबंधित यंत्रणांकडे दिल्याचा सोमय्यांनी दावा केला होता. त्यानंतर दोन दिवसातच अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर अस्लम शेख आणि मोहित कंबोज आमने सामने आले होते. मात्र, आजच्या भेटीदरम्यान दोघांमधील तणावदेखील निवळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेप्रमाणे काँग्रेसला तर धक्का बसणार नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.