मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याच्या अगोदर मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा घातली होती. या पुजेविरोधात ठाणे न्यायालायत याचिका दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ७ जुलैला सत्यनारायणाची पुजा करुन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. नवे सरकार स्थापन होऊन २९ दिवस झाले आहेत.
दरम्यान, या पुजेविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे यांच्या दालनातील सत्यनारायण पुजा घटनाविरोधी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ही याचिका दाखल केली. या याचिकेवर १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
यापूर्वी, मानवी हक्क कार्यकर्ते विकास शिंदे यांनी मंत्रालयातील धार्मिक विधीबाबत राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच संभाजी ब्रिगेडने देखील या विधीचा निषेधदेखील केला होता.