वाशिम : सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला. पण मुलगी झाल्याने नातेवाईकांची नाराजी होती. आठव्याच महिन्यात प्रसूती झाल्याने बाळाचे वजनही कमी. म्हणून तिला आयसीयूमध्ये ठेवले होते. या सर्व विचारातच महिलेने १० दिवसांच्या बालिकेला टाकून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले.
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील शौचालयातच कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कर्मचा-यांच्या संपामुळे दोन दिवस हा प्रकार कुणाला कळलाच नाही. शुक्रवारी सेवेत रुजू झाल्यानंतर हा प्रकार सफाई कर्मचा-यांच्या निदर्शनास आला. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथील २५ वर्षीय गोदावरी राजेश खिल्लारे नामक महिलेला ता. २ मार्च रोजी प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. ता. ३ मार्च रोजी महिलेचे सीझर झाले. तिने मुलीला जन्म दिला.
लग्नानंतर चार वर्षांनी तिला बाळ झाले अन् तीही मुलगी म्हणून नातेवाईकांची नाराजी होती. या दरम्यान १५ मार्च रोजी सकाळपासूनच गोदावरी खिल्लारे आयसीयूमध्ये असलेल्या दहा दिवसांच्या बाळाला सोडून बेपत्ता झाली होती. महिलेच्या नातेवाईकांसोबतच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार दिली.
नातेवाईक शोधात असताना दोन दिवसांनंतर कामावर रुजू झालेल्या सफाई कर्मचा-यांना वॉर्ड क्रमांक २२ मधील स्वच्छतागृहात दुर्गंधी आली. दरवाजा उघडताच महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.