मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी (ता. ५) होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता मंत्रिमंडळातील संभाव्य दोन नावांवरून चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपण मंत्रिमंडळात नसणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, सायंकाळपर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपच्या या निर्णयाने सर्वजण चकित झाले होते. त्याचपद्धतीने विस्तारातील मंत्र्यांच्या नावावरूनही धक्का बसू शकतो.
या धक्कादायक नावांमध्ये अपक्ष आमदार रवी राणा व नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा समावेश आहे. जे संभाव्य मंत्री शपथ घेऊ शकतात त्यात या दोघांच्या नावांचा समावेश आहे. रवी राणा हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार आहेत. शिवसेना सोडलेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात घेण्याचीही चर्चा जोरात सुरू आहे.
रवी राणा आणि नितेश राणे ही दोन नावे आश्चर्यकारक मानली जात आहेत. विशेष म्हणजे जिथे शिवसेना कमकुवत आहे तिथे एकनाथ शिंदे गटातील लोकांना मंत्रिपद दिले जावे, याची विशेष काळजी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत घेण्यात आली आहे. यामुळे उद्धव ठाकरे कमकुवत होण्यास मदत होईल, असा भाजपचा विश्वास आहे.