कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे आज संजय राऊत आणि शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. शाहू महाराज आणि संजय राऊतांच्या भेटीने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. मात्र, शाहू महाराजांनी हा आरोप खोडून काढत संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरून मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला नसल्याचे छत्रपती शाहू महाराजांनी म्हटले आहे. शाहू महाराजांच्या या प्रतिक्रियेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आज संजय राऊत आणि संजय पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली आहे.
कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे आज संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. या दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे अधिकृत उमेदवार संजय पवार हे देखील उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आमच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नसून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मी आज शाहू महाराजांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही महाराजांसोबत फोनवरून संवाद साधला आहे. छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे जुने नाते आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून छत्रपती घराण्याचे जुने संबंध आहेत. आमच्या या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: शाहू महाराजांसोबत चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.