25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात हुडहुडी

राज्यात हुडहुडी

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात हिवाळयात असलेले ढगाळ वातावरण आता निवळले असून गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हिच थंडी आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.

हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यभर गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना जाणवू लागली आहे. आता थंडीचा तडाखा येणा-या काही दिवसांत वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान आणखी कमी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आताही राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान खाली उतरले आहे तर विदर्भामध्येही तापमानाचा पारा स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये पहाटेच्या किमान तापमानामध्ये विशेष फरक जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात विशेषत: खान्देशात थंडी वाढणार असून दुपारीही उन्हाच्या चटक्यासह हलकी थंडीही असेल.

गोंदियात निचांकी तापमान
मंगळवारी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात निचांकी म्हणजेच ११.५ अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले होते. खरंतर, राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, सोमवारपासून वातावरण कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उत्तर भारताकडून राज्याकडे येणा-या थंड वा-यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे.

मराठवाडा आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा
यामुळे येणा-या काही दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भामध्ये कडाक्याची थंडी वाजेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. दरम्यान, मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत वातावरण कोरडे असणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या