पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू मेरियट हॉटेलजवळ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून निदर्शने केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि ४० कार्यकर्त्यांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी फिर्याद दिली आहे.
स्मृती इराणी यांच्या दौ-यादरम्यान झालेल्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे दौ-यावर आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या जे. डब्ल्यू. मेरियट या हॉटेलमध्ये थांबलेल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिका-यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी इराणींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना हॉटेलच्या परिसरातून बाहेर काढले.