22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्ररिक्षाभाडे वाढणार, मुंबईकरांना बसणार झळ

रिक्षाभाडे वाढणार, मुंबईकरांना बसणार झळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : खटुआ समितीच्या आधारे महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे मुंबई महानगरातील टॅक्सी, रिक्षांची येत्या १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करणार असल्याचे सरकारने शुक्रवारी तत्त्वत: मान्य केले. त्यानुसार रिक्षाचे भाडे दोन, तर टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाडेवाढीच्या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने आतापर्यंत संपातून तीन वेळा माघार घेतली. आजही मंत्रालयात झालेल्या बैठकीत येत्या २६ सप्टेंबरपासून होणारा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे संपाचा धाक दाखवून भाडेवाढीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने येत्या २६ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या वेळी परिवहन विभागाचे सचिव, आयुक्त, अधिका-यांसह रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

येत्या सोमवारी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची (एमएमआरटीए) बैठक होणार असून त्यात भाडेवाढीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले. त्यानुसार रिक्षाचे भाडे दोन, तर टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून रिक्षाचे किमान भाडे २१ ऐवजी २३ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे २५ ऐवजी २८ रुपये मोजावे लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या