मुंबई : पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच यासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
राज्यात यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून यामुळं शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तब्बल ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. यापार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतक-यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
राज्यात अतिवृष्टीची शक्यता
जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतक-यांचा जीव भांड्यात तर पडला. मात्र पेरणीनंतर आलेला धुवाँधार पाऊस आणि पुरामुळे पिके अक्षरश: पाण्यात गेली. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नुकसानीचे अजूनही पंचनामे झाले नाहीत
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पत्रात सततच्या पावसामुळे शेतपिके वाहून गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणे, खते यांचे नुकसान झालेले आहे. आजपर्यंत १०० पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरीत ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे दुर्देवाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.