पुणे : राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहका-यावर गोळीबार करून स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली येथील मरपल्ली येथे ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. वैयक्तिक वादातून जवानाने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गडचिरोलीसह पुण्यात खळबळ उडाली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहका-याची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यातील बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. पुण्याहून हे दोन्ही जवान गडचिरोलीमधील पोलिस मदत केंद्र (मरपल्ली) येथे तैनात होते. राज्य राखीव दलाच्या जवानांमधील अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जवानाने आपल्या रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोघा जवानांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. श्रीकांत बेरड आणि बंडू नवतरला अशी मयतांची नावे आहेत. दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. या प्रकारामुळे गडचिरोलीतील एसआरपी कॅम्पमध्ये खळबळ माजली आहे. रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली.