मुंबई : १५ ते १८ या वयोगटाचे लसीकरण वेगाने करता यावे, यासाठी शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसेच लसीकरणाबाबत जे जिल्हे मागे आहेत, तेथेही विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. तिस-या लाटेत कोरोनाचा प्रभाव सौम्य असला तरी संसर्गाचा वेग व पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याने पुढील काही काळ काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात यावी, असाही निर्णय घेण्यात आला. राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना स्थितीबद्दलचे सादरीकरण करण्यात आले. त्यावर सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर १५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचे शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही बैठकीत झाली. लसीकरणाबाबत पालकांमध्ये संभ्रम असण्याचे कोणतंही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचेही लसीकरण सुरू झालेले आहे. आपल्याकडे सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलाचेच लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना योग्य ती काळजी घेतली जाईल. असे टोपे यांनी सांगितले.