24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रईडब्ल्यूएस प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण

ईडब्ल्यूएस प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. यावरून राजकारण तापत असतानाच ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवारांना आरक्षणाचा १० टक्के लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्यात हा मुद्दा संवेदनशील बनत चालला आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकारला धारेवर धरले जात आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनीही सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मराठा समाजातूनही सरकारबद्दल नाराजीचा सूर असून, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणीही होत होती. अखेर राज्य सरकारने याबद्दलचा निर्णय आज घेतला. राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.राज्य सरकारने याबद्दलचा आदेश आज जारी केला. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोक-यांमधील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.

खा. संभाजीराजेंनी दिला होता इशारा
मराठा आरक्षणावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ६ जूनपर्यंत मराठा समाजासाठी ठोस भूमिका न घेतल्यास शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून एल्गार पुकारण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. तसेच आमदार विनायक मेटे यांनीही ५ जूनला बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. भाजपही या मुद्यावरून आक्रमक झाल्याने राज्य सरकारला यासंदर्भात मार्ग काढणे आवश्यक होते. त्या दृष्टीने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

देशांतर्गत विमान प्रवास महागणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या