मुंबई: वृत्तसंस्था
निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोंकण परिसराची वाताहत झाली, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि़ ६ जून रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली होती, त्याच प्रमाणे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसराचा दौरा करून, नुकसानीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ काँफरन्स घेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ कोटी रूपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी रूपये तात्काळ मदत जाहीर केली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे; मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले. या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी खा़ विनायक राऊत, एकनाथ शिंदे , उदय सामंत, अनिल परब, दादा भुसे आणि सर्व जिल्हाधिकारी आणि आ़ योगेश कदम,आमदार वैभव नाईक, सर्व लोकप्रतिनिधी यांचे समवेत संवाद साधला.
अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत, त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.
Read More नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी – रामदास आठवले