मुंबई : काही महिन्यांपूर्वी कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाल परी अशी ओळख असलेल्या एसटीला भलामोठा ब्रेक लागला होता. त्यातून एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशा स्थितीत एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने महामंडळासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे एसटी कर्मचा-यांना वेळेवर वेतन मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शासनाने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचा-यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला ३६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील ३०० कोटी रुपये एप्रिलसाठी, तर ३६० कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत.
गेल्यावर्षी ऐन दिवाळीपासून एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे जवळपास ५ महिने एसटी बसचे चाके जागेवरच रुतले होते. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले. या कर्मचा-यांना नियमित वेतन मिळावे, यासाठी शासनाने एसटीला पुन्हा मोठी मदत केली आहे.
एसटी कर्मचा-यांचा पगार केला कमी!
एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटी महामंडळाला १०० कोटी दिले, त्याबद्दल आभार. मात्र, एसटी कामगारांचा गेल्या महिन्यापासून तीन ते चार हजारांनी पगार कमी झाला आहे. कारण आम्हाला एकतर्फी पगारवाढ दिली होती, त्याचे ४८ हप्ते संपले आहेत. तसेच महागाई आणि घरभाडे भत्त्याचे १२०० कोटी राज्य सरकारकडे देय आहेत. ते आम्हाला देण्यात यावेत, जणेकरुन दरमहा तीन ते चार हजारांनी कमी झालेला पगार मिळेल, असे म्हटले.