34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावीची परीक्षा रद्द केलेल्या नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - शिक्षणमंत्री...

दहावी, बारावीची परीक्षा रद्द केलेल्या नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने अथवा मंडळाने घेतलेला नाही. याबाबतच्या बातम्या पुर्णतः चुकीच्या असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. अशा निराधार बातम्या देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या माध्यमांबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द होणार असल्याचे वृत्त आज काही माध्यमांनी दिल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तामिळनाडू सरकारने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झालं होते. मात्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याचे खंडन केले. असे कोणतेही वक्तव्य मी केलेलं नाही. आपला संदर्भ देऊन प्रसारित होणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रश्नचिन्हं टाकून अशा बातम्या देणे बरोबर नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागच्यावर्षी पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नव्हती. तशी स्थिती निर्माण झाली तर यंदाही तसा विचार होऊ शकतो, असे आपण सांगितले होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे परीक्षांचं ताण यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत याची जाणीव मला आहे. परंतु पुढच्या शिक्षणासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं आवश्यक आहे.

या परीक्षा ऑनलाईन घेता येणार नाहीत असं दहावी आणि बारावी बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा आम्हाला ऑफलाईनच घ्याव्या लागतील. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विद्यार्थ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन कसा मार्ग काढता येईल याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत. तामिळनाडूचा निर्णयही आम्ही तपासून पाहत आहोत. मात्र आज तरी दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ग्रामीण भागात ४० टक्के स्वयंपाक पुन्हा चुलीवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या