22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रसेनेचे १२ खासदार शिंदे गटात?

सेनेचे १२ खासदार शिंदे गटात?

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यातच आज राजधानी दिल्लीत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. उद्या (मंगळवारी) यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. समर्थक खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेना पुन्हा एनडीएचा घटक होत असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची, तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची फेरनियुक्ती केली जाऊ शकते आणि याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्याच दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याबरोबरच शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरही फूट पडू शकते.

शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार शिंदे गटासोबत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. सध्या शिवसेना खा. विनायक राऊत लोकसभेत गटनेते आहेत, तर मुख्य प्रतोद म्हणून राजन विचारे आहेत. उद्या दिल्लीत जाऊन काय घोषणा करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. राज्याबरोबरच आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेत मोठी फूट पडल्यास उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो.

शिंदे गटाकडून सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
शिंदे गटाच्या आज झालेल्या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी केली. नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावण्यात आलेला नाही. नव्या कार्यकारिणीत शिवसेनेने बडतर्फ केलेले रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड केली, तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांची निवड केली आहे.

कदम, आडसूळांची हकालपट्टी, शिंदे गटात नेतेपदी नियुक्ती
शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यानंतर शिंदे गटाने त्यांची नेतेपदी नियुक्ती केली.

मूळ पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करणे बेकायदेशीर
पक्षातून बाहेर पडलेल्या एखाद्या गटाला मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करता येते का, असा सवाल करताना हे बेकायदेशीरच नव्हे तर हास्यास्पद असल्याचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या