24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्र४ महिन्यांत तब्बल २.५ हजार कोटी बुडाले!

४ महिन्यांत तब्बल २.५ हजार कोटी बुडाले!

एकमत ऑनलाईन

एसटी महामंडळ संकटात, बससेवा ठप्प असल्याने रोज २३ कोटींची हानी, वेतनालाही पैसे नाहीत

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाके थांबली. यामुळे ४ महिन्यांत महामंडळाला तब्बल अडीच हजार कोटींचा दणका बसला. उत्पन्नाला लागलेल्या ब्रेकमुळे कर्मचाºयांचा जून महिन्याचा पगार अजूनही मिळाला नाही. जिल्ह्याअंतर्गत बसवाहतूक सुरू झाली असली तरी त्यातून डिझेलचा खर्चही निघत नाही. आता राज्यभर एसटीची गावागावात मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळाचे एकूण १ लाख ३ हजारांवर कर्मचारी असून, त्यांच्या वेतनासाठी जवळपास अडीच कोटी रुपये लागतात.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्या दिवसापासून एसटी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १८ हजारांवर बसेस डेपोमध्येच अडकल्या. यातून महामंडळाला रोज २३ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. चार महिन्यांत सुमारे अडीच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे महामंडळाची आर्थिक अवस्था बिकट झाली. वेतनालाही पैसे नसल्याने कर्मचा-यांचे जूनमधील पगार थकले आहेत. तसेच मार्चचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. त्यामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

यातून कर्मचा-यांच्या अडचणी वाढत असल्याने सरकारने महामंडळाला दरमहा चारशे कोटीची मदत करून या कर्मचाºयांना मदत करावी. अशी मागणी पुढे येत असून, विविध संघटना यासाठी पुढे येत आहेत. सरकारही यासाठी उपाययोजना करीत असून, यावर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत यावर मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जूनचे वेतन अद्याप नाही
दरमहा १ ते ७ तारखेपर्यंत पगार होतो. जुलै महिना संपला तरी अजूनही कर्मचारी जून महिन्याचा पगार कधी मिळेल, याची प्रतीक्षा करत आहेत. यामुळे कर्मचा-यांची बिकट अवस्था झाली आहे. एसटी बसेसची वाहतूक बंद असल्याने महामंडळाला तोटा होत असल्याचे कारण पुढे करून कर्मचा-यांचा पगार थांबवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. यातूनच शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील एका एसटी कामगाराने आत्महत्या केली. त्यामुळे कर्मचाºयांमधील असंतोष वाढत चालला आहे.

अल्प सेवेलाही प्रतिसाद मिळेना
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यात जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. बहुतांशी बसेस रिकाम्याच धावत असल्याने या सेवेतून अनेक ठिकाणी डिझेलचा खर्चही भागत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आता गावागावांत मालवाहतूक सेवा
एसटी सेवा ठप्प असल्याने एक तर एसटी महामंडळ अभूतपूर्व संकटात सापडले आहे. यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रमुख शहरात ही सेवा दिली जात होती. त्यातून तीन कोटींचे उत्पन्न मिळाले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आता गावागावांत ही सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाचशेवर ट्रकचा वापर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Read More  देशात ५५ हजारांवर वाढले रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या