मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय १ हजार ७४३ जण कोरोनामुक्त झाल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ९ हजार १०६ वर पोहचली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार ८३१ असून, १९ लाख १२ हजार २६४ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद साधताना स्पष्ट केलेले आहे. लशीबाबत पसरवल्या जाणा-या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन देखील केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीपासून तीन कोटी आरोग्य कर्मचारी व आघाडीच्या कार्यकर्त्यांना लस देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. तर, ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस आढळून आलेला कोरोनाचा उत्परिवर्तीत विषाणू जास्त घातक असून, तसे पुरावे मिळाले असल्याची माहिती पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.
नवीन विषाणूच्या धोक्यांबाबत माहिती देणा-या सल्लागार गटाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे जॉन्सन यांनी सांगितले की, कोरोनाचा नवा प्रकार जास्तच घातक आहे. असे असले तरी फायझर-बायोएनटेक व ऑक्सफर्ड- ऍस्ट्राझेनेका यांच्या लशी त्यावर परिणामकारक आहेत. हा विषाणू वेगाने पसरणारा असून, आता त्याचे पुरावे मिळाले आहेत. हा विषाणू पहिल्यांदा लंडन व आग्नेय इंग्लंड भागात सापडला होता, त्याचा मृत्युदर अधिक आहे.
महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – कोरोनाची भीती