मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या अतिरिक्त बसेस ३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो नागरिक कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली आहे. एसटी महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्ताने जादा बसेस सोडण्यात येतात. या बस सेवेला कोकणवासियांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. होळी निमित्त होणाऱ्या जादा बसेसलादेखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो.