मुंबई : गेली दोन वर्षे द्राक्ष उत्पादक शेतक-यांसाठी अत्यंत कठीण गेली. मात्र, यंदा नववर्षाची सुरुवातच द्राक्ष निर्यातीसाठी चांगली झाली असून, गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रातून युरोपीयन देशांमध्ये २६२९ कंटेनर्समधून ३४ हजार ७८७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यात सर्वाधिक ३२ हजार २७२ मेट्रिक टन द्राक्षे एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेली आहेत. यातून कोट्यवधींचे परकीय चलन भारताला मिळाले आहे.
देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असून, नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे. नाशिक जिल्ह्यात ६२ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. त्यात निफाड, दिंडोरी आणि नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे राज्यातील ९१ टक्के द्राक्षनिर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असून, यंदा तर नवववर्षाच्या पहिल्या दहा दिवसांत एकट्या युरोप खंडात नाशिक जिल्ह्यातून १९७ मेट्रिक टन द्राक्षे रवाना झाली होती. त्यानंतर आता जवळपास एका महिन्यात नाशिक जिल्ह्यातून ९५७६.१५० मेट्रिक टन द्राक्षांची युरोप खंडात निर्यात झाली आहे, तर आतापर्यंत ३२ हजार २७२ मे. टन द्राक्षनिर्यात झाली आहे. त्यात नेदरलँण्डमध्ये सर्वाधिक २५ हजार ९४२ मे. टन (१९६४ कंटेनर्स) तर सर्वांत कमी २६ मे. टन द्राक्षे ग्रीस या देशात निर्यात झाली आहेत.
नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, युकेत निर्यात
युरोप खंडातील नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, यूके आणि डेन्मार्क हे द्राक्षांची आयात करणारे मुख्य देश आहेत. युरोप वगळता इतर खंडांचा विचार केला तर रशिया, यूएई, कॅनडा, तुर्की आणि चीन या देशांतून द्राक्षांना मोठी मागणी असून, येथेही मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात झाली आहे.
१५ फेब्रुवारीनंतर निर्यात सुरू
१५ फेब्रुवारीनंतर निर्यातीचा खरा काळ सुरू झाला असून, द्राक्षाला योग्य दर मिळावा, यात घसरण होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा द्राक्षांची निश्चितच चांगली निर्यात होईल, शेतक-यांनीदेखील निर्यातक्षम चांगली द्राक्षे घेतली आहेत. सव्वा लाख मे. टनाहून अधिक निर्यात होईल, असा अंदाज आहे.
दोन वर्षे बसला फटका
मागील दोन वर्षे आधी कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका द्राक्षनिर्यातीला बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र, यंदा वर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हानिहाय निर्यात
महाराष्ट्रातून युरोपियन देशांत द्राक्ष निर्यात झाली असून एकट्या नाशिक शहरातून ३२ हजारांहून अधिक मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून १५६२ मेट्रिक टन, सातारा जिल्ह्यातून ६१६ मेट्रिक टन, अहमदनगर जिल्ह्यातून १६६ मेट्रिक टन, पुणे जिल्ह्यातून ६२ मेट्रिक टन, लातूर जिल्ह्यातून ५० मेट्रिक टन तर उस्मानाबाद जिल्ह्यातून ३२ मेट्रिक टन द्राक्षे निर्यात करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक द्राक्षे ही नेदरलँड ला पाठविण्यात आली आहेत. नेदरलँडला २५ हजार ९४२ मेट्रिक टन इतकी द्राक्षे पाठविण्यात आली आहेत.