नागपूर : भारत सरकारने दोन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींचा त्यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा कार्यक्रम १६ जानेवारीला सुरू करण्यात आला. मात्र, नागपूरमधील डॉक्टरांनी पहिल्या दिवशी लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. नागपूरमध्ये पहिल्या दिवशी ५३ डॉक्टर्सनी लस घेतली तर ४४ डॉक्टर्सनी लस घेतली नाही.
डॉक्टरांची भूमिका काय?
नागपूरमधील काही डॉक्टरांनी ‘स्वदेशी कोवॅक्सिन कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. पहिल्या दिवशी नागपूर मेडिकलमध्ये ४४ डॉक्टर्स लस घेण्यास आले नाहीत. यापैकी काही डॉक्टरांना लसीच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम आहे. तर, काही डॉक्टर लसीच्या परिणामाची वाट पाहत आहेत, असे मेडिकल प्रशासनाकडून सांगण्यात येतेय.
लसीकरण प्रमुखांचे मत
मेडिकल लसीकरण टीमचे प्रमुख डॉ. उदय नार्लावार यांनी कोरोना लसीकरणाला डॉक्टरांनी गैरहजेरी लावण्यामागे कोवॅक्सिन लसीबाबत संभ्रम हे कारण असल्याचे सांगितले. नागपूरमध्ये कोवॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. पहिल्या दिवशी ५६ लोक लसीकरणासाठी आले होते. त्यापैकी ३ लोकांना लस देता येत नव्हती. ज्या ५३ जणांनी कोवॅक्सिन लस घेतली त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून आला नाही, असे डॉ. उदय नार्लावार म्हणाले.