सिंदखेडराजा : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पेपर फुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना सापडला नाही. पोलिस त्याचा तपास घेत आहेत. राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याना पेपर फुटीच्या मुद्दावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरले होते. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळातील गोंधळानंतर सरकारने पेपर फुटीप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणानंतर बुलढाण्यातील ४ परीक्षा केंद्रांचे संचालक तडकाफडकी बदण्यात आले आहेत.
गणिताचा पेपर पुन्हा घेणार नाही
पेपर फुटल्यानंतर पुन्हा एकदा पेपर होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पुन्हा गणिताचा पेपर घेतला जाणार नाही.