23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रगोविंदांना नोक-यांत ५ टक्के आरक्षण, विम्याचेही संरक्षण

गोविंदांना नोक-यांत ५ टक्के आरक्षण, विम्याचेही संरक्षण

एकमत ऑनलाईन

मुंबई : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. गोविंदांना १० लाखांपर्यंतचे विमा संरक्षण आणि सोबतच नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. त्यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूंचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, तर दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास ७ लाख ५० हजार, एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल, अशी घोषणा केली.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणा-या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून विम्याबाबत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासोबतच गोंविंदांना खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणा करतानाच ज्या सुविधा इतर खेळातील खेळाडूंना लागू असतात, त्या सर्व सुविधा आता गोविंदांनाही लागू होतील. तसेच राज्य सरकारने खेळाडूंना नोक-यांमध्ये दिलेल्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे.

प्रो गोविंदा स्पर्धाही घेणार
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीच्या (गोविंदा) प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अटी आणि शर्ती
– दहीहंडीसाठी स्थानिक परवानगी आवश्यक
-न्यायालय, प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून दिलेल्या सूचनांचे आयोजक संस्था आणि गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक.
-गोविंदांच्या सुरक्षेची काळजी संस्थांनी घ्यावी. पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.
-मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास आर्थिक सहाय्य अनुज्ञेय नाही.
– वयोमर्यादेचे पालन आवश्यक असून १८ वर्षाखालील गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय नाही.
-मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना आयोजकांनी तात्काळ वैद्यकीय मदत द्यावी.

-मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणेकडे अहवाल द्यायला हवा.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या