पारनेरमध्ये शिवसेनेचे ५ नगरसेवक राष्ट्रवादीत

361

अहमदनगर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरकूर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पारनेरच्या शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी आज दुपारी बारामतीला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनीही प्रवेश केला. नगराध्यक्षांविरुद्धचा रोष असे प्रथमदर्शनी कारण सांगितले जात आहे.

मात्र, येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. या अगोदर जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.

Read More  करोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ