26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार...

मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१७ (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौते चक्रीवादळाचा मोठा तडाखा सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगडसह मुंबईला बसला आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे व तुफान पाऊस व वादळामुळे समुद्राला आलेल्या तुफानामुळे कोकणातील हजारो घरांचे व आंबा, नारळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे. वेगाने वाहणारे वारे व अतिवृष्टीचा मुंबईलाही मोठा फटका बसला व जनजीवनही ठप्प झाले होते. शेकडो वृक्ष उन्मळून पडल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मुंबई विमानतळही दिवासभरासाठी बंद करण्यात आले होते. वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील १२ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

केरळकडून गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या तौते चक्रीवादळाचा आज कोकण, मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. या वादळाचा मार्ग अरबी समुद्रात मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर होता. तरीही त्याचा प्रचंड प्रभाव किनारपट्टीच्या जिल्ह्यात तर जाणावलाच, पण कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, नाशिक आदी जिल्ह्यातही वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी माध्यरात्रीपासून चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. किनारपट्टीवरील सुमारे साडेबारा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे फारशी जीवितहानी झाली नसली तरी घरांचे व शेतीचे फार मोठे नुकसान या तिन्ही जिल्ह्यात झाले आहे. मागच्यावर्षी फयान वादळाने मोठे नुकसान केले होते. त्यातून लोक अद्याप सावरलेले नसताना आंबा व नारळाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन, रत्नागिरी जिल्ह्यात एक, व रायगड जिल्ह्यात तिघांचा या चक्रीवादळात मृत्यू झाला आहे. तर सुमारे अडीच हजार घरांची पडझड झाली आहे. देवगडच्या समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाली असून चार खलाशी बेपत्ता आहेत.

मुंबईत तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत
मुंबई व शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. रात्रीपासूनच मुंबईत जोराचा वारा वाहत होता. चक्रीवादळ जसजसे मुंबईच्या जवळ येत होते, तसतसा वाऱ्याचा वेग व पावसाचा जोर वाढत गेला. दुपारपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी १२० की.मी. पर्यंत पोहचला होता.

वादळी वाऱ्यांमुळे मुंबई शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहनांचे तर नुकसान झालेच, पण रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर वाढल्याने मंत्रालयासह दक्षिण मुंबईतील सखल भागात, तसेच दादर, हिंदमाता, मिलन सबवे, वांद्रे, सायन, कुर्ला, अंधेरी, कांदिवली भागात पाणी साचले होते. वादळी वारे व तुफानी पावसामुळे सकाळी ११ वाजल्यापासून वांद्रे-वरळी सी-लिंक वरील वाहतूक बसह करण्यात आली होती. दृष्यमान कमी असल्याने मुंबई विमानतळही बंद करून बाहेरून येणारी विमानं अन्य शहरांकडे वळवण्यात आली होती.

अजितदादा मंत्रालयाच्या, तर आदित्य ठाकरे मंत्रालय कंट्रोल रुममध्ये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः फळबागांचं नुकसान मोठं झालं असून त्यांचे पंचनामे करायला सांगितले आहेत. नियमानुसार मदत केली जाईलच पण अतिरिक्त मदत करण्याबाबत विचार करु,असे अजित पवार यांनी सांगितले.

कोकणात अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे, तिथला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी बाहेरून अतिरिक्त टीम पाठवण्यात येतील, असे अजित पवार यांनी सांगितलं. पर्यटन मंत्री व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे ही मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुमममधून स्थितीवर नजर ठेवून होते. १६० मिमी पाऊस, वादळीवाऱ्यासह होतोय, मनुष्यहानी काही होणार नाही, याची काळजी घेत आहोत. असे चक्रीवादळ कधीही मुंबईने बघितले नव्हते,असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

जंबो कोविड सेंटरचे नुकसान
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स व अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर्सचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून कोविड सेंटरमधील रुग्णांना कालच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे अनर्थ टळला, केविड सेंटरचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे उखडला गेला आहे. काही भागाचे छप्पर उडाले आहे.

लसीकरणानंतर रक्ताच्या गाठींचे प्रमाण नगण्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या