ऑनलाईन, ऑफलाईनचे प्रमाण ठरले, उदय सामंत यांची माहिती; ३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान होणार परीक्षा
नांदेड : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, असा निर्णय दिल्याने येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्क्के ऑनलाईन व ४० टक्के ऑफलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सह्याद्री शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सामंत पुढे म्हणाले की, या परीक्षा सर्व १३ अकृषी विद्यापीठात येत्या ३ आक्टोबर ते २५ आक्टोबरदरम्यान होतील, राज्यातील उर्वरित विद्यापीठात ९० ते ९५ टक्के ऑनलाईन परीक्षा आयोजित केल्या जातील. राज्यात सर्व विद्दापीठांतर्गत ७ लक्ष ९२ हजार विद्यार्थी परीक्षा देतील, तर स्वाराती विद्यापीठात जवळपास ५० हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसतील. आपण राज्यातील सर्व १३ विद्यापीठाला भेटी देऊन अडीअडचणी समजावून घेऊन सुसंवाद साधत आहेत. आतापर्यंत ८ विद्यापीठास भेटी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना विश्वास देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सामंत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. जवळपास पन्नास हजार विद्यार्थी एम.सी.क्यू. पॅटर्नमध्ये परीक्षा देणार आहेत. ४५ दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेले आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले, तर परिषदेचे नियोजन स्वारातीम विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले.
परीक्षा सुरळीत पार पडतील अशी आशा
विद्यार्थ्याच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देऊन या परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेवून या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील, अशी आशाही यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
विद्यापीठात लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार
विद्यापीठाच्या विकासाबाबत ते म्हणाले की, लवकरच विद्यापीठामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात येणार आहे. मुला-मुलींचे वसतिगृह, शासकीय अध्यापक महाविद्यालय याच परिसरात उभारण्यात येणार आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
रझाकारांना कडवी झुंझ देणारे नरवीर माधवराव नळगे