मुंबई,दि.६ (प्रतिनिधी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी परदेशातून विविध सोशल मीडिया साईटवर तब्बल ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज दिली आहे. मुंबई सायबर सेल पुढील तपास करत असून यामागील सुत्रधारांना शोधून काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर विरोधक व काही वृत्तवाहिन्यांनी संशयाचे काहूर निर्माण केले होते. ही आत्महत्या नव्हे, तर हत्या आहे व राज्यातील एका तरुण मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोपांची राळ उडवली गेली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्सचा अहवाल आला व त्यात सुशांतसिंह याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आजवर टीकेचा व आरोपांचा भडिमार सहन करणाऱ्या मुंबई पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन मध्यंतरीच्या काळात अत्यंत नियोजनपूर्वक बदनामीची मोहीम राबवणाऱ्या अज्ञात लोकांचा शोध सुरू केला आहे. हा शोध घेताना राज्य सरकार व मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल ८० हजार बोगस सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेने सुरू केलेल्या तपासात ही बोगस अकाउंट इटली, जपान, पोलंड, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या देशातून चालवली जात होती, अशी माहिती पुढे आली आहे.
मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी आणि आमच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी या बोगस अकाऊंटवरून मुंबई पोलीसांविरुद्ध मजकूर पोस्ट करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरु केला असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८४.८३ %