मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना हाताशी घेऊन केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर आले तेव्हा शिवसैनिकांची गर्दी झाली. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत राज्यभर आंदोलनं केली आहेत. आता ९२ वर्षांच्या आजीही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत.
नवनीत राणांविरोधात केलेल्या हटके आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या ९२ वर्षांच्या शिवसेनेच्या फायरबॅण्ड आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समोर आले आहे. आजी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. आजींना मुख्यमंत्री स्वत: भेटले की इतर कोणी ? हे अद्याप समजलेलं नाही. पण तासभर आजी मातोश्रीमध्ये होत्या.
एकीकडे आज परभणीच्या खासदारांसह ईतर पदाधिका-यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असतांना आजींना मात्र एन्ट्री मिळाली आहे. नवनीत राणांविरोधात शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान चंद्रभागा शिंदे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांद्रभागा शिंदे यांच्या घरी जाऊन भेटही दिली होती.