चंद्रपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अद्याप थांबलेला नाही. यातच आता तेलंगणातील काही गावांनी त्यांना वेगळे करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तेलंगणाला लागून असलेल्या १४ गावांनी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद केंद्र सरकारकडे गेला असून दोन्ही राज्यांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठकही झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा हे गाव दोन राज्यांच्या सीमेवर आहे. गावात एक असेही घर आहे जे दोन्ही राज्यांत आहे.
महाराजगुडा गावातील उत्तम पवार यांचे घर दोन्ही राज्यांत विभागले आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर दोन्ही राज्यांची सीमारेषा खडूने ओढली असून रेषेच्या दोन्ही बाजूला तेलंगणा आणि महाराष्ट्र असे लिहिले आहे. घराच्या मधोमध दोन राज्यांची सीमा असली तरी आम्हाला काही अडचण नसल्याचे उत्तम पवार यांनी म्हटले आहे.
घरमालक उत्तम पवार म्हणाले की, घरात ८ खोल्या आहेत. त्यापैकी ४ खोल्या या तेलंगणात येतात तर उरलेल्या महाराष्ट्रात आहेत. घरात आम्ही १२ ते १३ जण राहतो आणि आमचे स्वयंपाकघर हे तेलंगणात आहे.
सीमा निश्चित करण्यासाठीचा सर्व्हे १९६९ मध्ये झाला होता. तेव्हा आम्ही आमचे घर अर्धे महाराष्ट्रात आणि अर्धे तेलंगणात असल्याचे सांगितले होते. आम्हाला यामुळे काही त्रास होत नाही. आम्ही दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायतीत कर भरतो आणि तेलंगणा सरकारकडून अनेक योजनांचा लाभ घेतो, असेही पवार यांनी सांगितले.
भारत-म्यानमार सीमेवर अख्खं गाव
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह जगात अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे जिथे घर दोन राज्ये, देश यांच्या सीमेवर आहे. भारत-म्यानमार सीमेवर नागालँडमध्ये लोंगवा गावात असेच एक घर आहे. या घराचा अर्धा भाग हा भारतात तर उर्वरित भाग म्यानमारमध्ये आहे.
म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा घराच्या मध्यभागातून गेली आहे. लोंगवा गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व असून ते दोन्ही देशांमध्ये राहू शकतात.
एका घराला दोन डोअरबेल
नेदरलँड आणि बेल्जियम सीमेवरही असेच एक घर आहे. या घराला दोन डोअरबेल आहेत. घराच्या बाहेर रस्त्यावर दोन देशांची सीमारेषा दाखवणारी एक रेषा दिसते.
फक्त हे एकच घर असे नाही तर याशिवाय अनेक दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंटही आहेत जी दोन्ही देशांच्या सीमारेषेवर आहेत.
अमेरिका-कॅनडा सीमेवर दोन मजली इमारत
अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर दोन मजली घराचा काही भाग हा अमेरिकेत तर काही भाग कॅनडाच्या हद्दीत आहे. १७८२ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत असून यात नऊ बेडरूम आहेत. या इमारतीला ओल्ड स्टोन हाऊस म्हणून ओळखले जाते.