मुंबई : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचे महत्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.
मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती.
महानुभाव संप्रदायाचे साहित्याला योगदान
मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास ३० हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
– श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन क रणार
– विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
– मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
– सांगली नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपये
– राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : ५० कोटी रुपये
– दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : ११५ कोटी रुपये
– कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
– विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : १० कोटी रुपये
– स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता ५० कोटी रुपयांचा