मुुंबई : एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहून त्यानं आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची हमी दिली आहे. सध्या हे पत्र भंडारा जिल्ह्यात चांगलेच व्हायरल होत आहे. पवन खवास असे या शिवसैनिकाचे नाव आहे. या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षासोबत आपण आजही निष्ठेने सोबत राहू अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्याने नवनवीन घडामोडी सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. शिवसेनेला आता खरी शिवसेना हीच आहे, हे सिध्द करण्याचं आव्हान आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत प्रत्येक तालुक्यातून शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचं आवाहन केलं होतं. याच आवाहनाला साथ देत तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील युवा शिवसैनिक पवन खवास तरुणाने स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षनिष्ठेने प्रेमपूर्वक निष्ठेने पत्र लिहले आहे.