22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिपदावरून रस्सीखेच?

मंत्रिपदावरून रस्सीखेच?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सरकार स्थापन होवून २५ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यातच आज शिंदे गट आणि भाजपच्या मोजक्या नेत्यांना दिल्लीत बोलावले असून, भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद असल्यानेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे तब्बल चारवेळा दिल्ली दौ-यावर जावून आले. तरीदेखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होत नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळात भाजपला २९ कॅबिनेट मंत्री, तर शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री अशी एकूण १३ मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक मंत्रिपदे हवी आहेत, त्यावरून मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत खलबते
दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी खलबते सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन हे आज संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती ताजी असतानाच आता शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनादेखील दिल्लीतून बोलावणे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील रात्री दिल्ली जाणार असल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या