26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात मुसळधार

राज्यात मुसळधार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, औरंगाबाद, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एका वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलिस आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण १४ वर्षीय मुलगी सापडली नाही.

औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यात महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, १४ वर्षांची मुलगी सापडली नाही. तिचा शोध सुरू आहे.

कोकणातही मुसळधार सुरू असून, औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली आहे.

कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिस-यांदा पाण्याखाली गेला आहे, तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यालाच नदीचे स्वरूप आले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

विदर्भात वादळी वा-यासह दणका
बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा तडाखा बसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यासोबतच जळगाव जिल्ह्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वा-यासह विजेच्या कडकडाटात जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

औरंगाबादेत दोघांना वाचविले
औरंगाबादेतही ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. यातील वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या