खडकवासला : चांदणी चौकात पीएमपी बस आणि ट्रकची एकमेकाला धडक लागून झालेल्या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान साता-याकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. त्यामुळे कोथरूडकडे जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला होता. पण आता दोन्ही अपघातग्रस्त वाहने दूर करण्यात आली असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू हायवेवरील चांदणी चौकातील प्रथमेश एलाईट इमारतीसमोर शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पीएमपी व ट्रकची एकमेकाला धडक बसल्यानं मोठा अपघात झाला होता. यामुळे साता-याला जाणारा रस्ता सुमारे दोन तास पूर्ण बंद झाला होता. परिणामी साता-याला जाणारी वाहतूक बावधन बाजूला ठप्प झाली होती. परिणामी मुळशी, पाषाण बावधन बाजूने कोथरूडला वाहने येऊ शकत नव्हती त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान, काही वेळातच वारजे वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आल्याने आता वाहतूक संथगतीने सुरू झाली आहे.