फुरसुंगी : एसटीचे ब्रेक निकामी झाल्याने मंतरवाडीमध्ये बस चारचाकीला धडकून अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बस जेजुरीवरून हडपसरच्या दिशेने येत होती. बसमध्ये जवळपास २० प्रवासी होते. मंतरवाडी येथे पोहोचल्यावर गाडीचे ब्रेक निकामी झाले असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने बसचा वेग कमी करत बसवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर बसच्या पुढे थांबलेल्या चारचाकी वाहनाला सावकाश धडकल्याने बस थांबली. यामध्ये चारचाकीचेही जास्त नुकसान झाले नाही.
चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली, असे प्रथमदर्शी सोमनाथ यादव यांनी सांगितले. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली. स्थानिक नागरिक तात्यासाहेब भाडळे, नवनाथ हरपळे यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यास आणि वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.
या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडी होत असते. वाहनांच्या बिघाडामुळे वाहने स्त्याच्या मधोमध बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहनचालकांनी वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी वाहनांची आवश्यक तपासणी करणे गरजेचे आहे.